भाजपच्या उमेदवाराबाबत उत्सुकता; तावडे, आठवले, रहाटकर, दानवेंच्या नावाची चर्चा
शिवसेनेकडून राहुल शेवाळेंचे तर शरद पवारांचे ठरत नसल्याने महाविकास आघाडीत संभ्रम
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या ७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे, तर शिवसेना पक्षाकडून राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांच्याकडून अद्याप होकार आलेला नसल्याने शिवसेना ठाकरे पक्षासह काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला आहे. दुसरीकडे, भाजपच्या नावाबाबत नेहमीप्रमाणे उत्सुकता असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्यासह तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांची नावे चर्चेत आहेत.
विधानसभा सदस्यांद्वारे राज्यसभेत निवडून जाणाऱ्या राज्यातील ७ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी उद्या, गुरुवारी अधिसूचना निघणार आहे. असे असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यसभेसाठीच्या उमेदवारांच्या शोधासाठी सर्वच पक्षांकडून चाचपणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या घरी पक्षाच्या मोजक्या नेत्यांची अनौपचारिक बैठकीत पार्थ यांच्या नावाला सहमती मिळाल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे पक्षाकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर आहे. शायना एनसी, संजय निरूपम, गजानन किर्तीकर हे सुद्धा राज्यसभेसाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, मुंबईत शिवसेनेच्या वाढीसाठी मराठी चेहरा असलेल्या शेवाळेंना संधी मिळेल असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजप पुन्हा धक्कातंत्र वापरणार का?
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४ तर शिवसेना, राष्ट्रवादी व एकत्रित महाविकास आघाडीचा प्रत्येकी १ उमेदवार राज्यसभेत निवडून जाऊ शकतात. भाजपकडून ४ जागांसाठी सध्या विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्यासह तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मंगळवारी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामधील काही नावे निश्चित करून दिल्लीत भाजप नेतृत्त्वाकडून पाठविली जाणार आहेत. आता दिल्लीत प्रदेश भाजपकडून पाठविण्यात आलेल्या नावावर शिक्कामोर्तब होणार की पुन्हा धक्कातंत्र वापरणार याची उत्सुकता आहे. गेल्या काही निवडणुकांत भाजपने राज्यसभेसाठी अनेक अनपेक्षित नेत्यांना संधी दिल्याची उदाहरणे आहेत.
विनोद तावडे, रामदास आठवलेंना संधी मिळणार
२०१९ मध्ये विधानसभा उमेदवारी नाकारल्यापासून तावडे हे दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर पक्षसंघटनेत कार्यरत आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या तावडेंनी भाजपला बिहारमध्ये मोठे यश मिळवून दिले आहे. त्याची बक्षिसी तावडेंना मिळू शकते असे बोलले जाते. तावडे यांची नुकतीच केरळ विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे २०२४ मध्ये लोकसभेत पराभूत झाल्याने राज्यसभेवर जाऊन आपले पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर, गेल्या काही वर्षापासून सातत्याने राज्यसभेसाठी ज्यांच्या नावाची चर्चा होत आली आहे त्या विजया रहाटकर यांना यावेळी नक्की संधी मिळेल असे त्यांच्या समर्थकांना वाटते. रहाटकर सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. रहाटकर यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्षपद सांभाळले आहे. सध्या त्या राष्ट्रीय सचिव म्हणून पक्षसंघटनेत काम करत आहेत. रायगडमधील धैर्यशील पाटील हे पुन्हा एकदा राज्यसभेसाठी प्रयत्नशील आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये दीड वर्षासाठी त्यांना राज्यसभेची संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ६ वर्षासाठी राज्यसभेवर संधी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. सोबतच, ४ पैकी राज्यातील ३ उमेदवार तर १ उमेदवार राज्याबाहेरील दिला जाऊ शकतो. तामिळनाडूचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या नावाची चर्चा आहे.
शरद पवारांच्या नकारामुळे शिवसेना ठाकरे- काँग्रेसचा दावा
शिवसेना ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांचे विधानसभेतील एकूण संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचा १ उमेदवार राज्यसभेवर निवडून जाईल. सध्या महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावाला पसंती आहे. परंतु, शरद पवार रुग्णालयात भरती असल्याने त्यांचे किंवा पक्षाचे काय भूमिका आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. शरद पवार राज्यसभेवर जाण्यास इच्छूक नाहीत परंतु पवारांसारखा अनुभवी नेता दिल्लीत असावा अशी आघाडीची भूमिका आहे. त्यामुळे पवारांचा नकार कायम राहिल्यास काँग्रेससह ठाकरे पक्षाने राज्यसभेवर दावा केला आहे. राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी, एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधिमंडळात जावे व महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे अशी काँग्रेसची भूमिका आहे. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेवरील हक्क सोडण्यास नकार दिला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्यास ठाकरे पक्षाची तयारी आहे. आता महाविकास आघाडीत कुणाला जागा सुटणार याची उत्सुकता आहे.
…………………….

